📅 06 October 2026, Tuesday
👤 एडिटर लॉगिन ✉️ संपर्क
पुणे

साकार फाउंडेशनच्या फिडे रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिमन्यु पुराणिक विजयी

पुणे दि.४ ऑक्टोबर : साकार फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिमन्यु पुराणिक यांनी विजेतेपद पटकावले. गुलमोहर बँक्वेट, अभिरुची मॉल, सिंहगड रस्ता येथे रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या या एकदिवसीय स्पर्धेत देशातील विविध राज्यांतील तसेच आइसलँडमधील खेळाडूंनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत एकूण २६५ खेळाडूंनी सहभाग घेतला.या मध्ये पुणे व महाराष्ट्रासह गुजरात, तेलंगणा आणि तमिळनाडू येथून खेळाडू स्पर्धेसाठी पुण्यात आले होते. तसेच आइसलँड येथील दोन खेळाडूंनीही स्पर्धेत सहभाग घेतला. 

ग्रँडमास्टरसह नामांकित खेळाडूंचा सहभाग

स्पर्धेत ग्रँडमास्टर अभिमन्यु पुराणिक यांच्यासह पुणे आणि पुण्याबाहेरील आंतरराष्ट्रीय मास्टर्सनी सहभाग घेतला. अक्षय बोरगावकर, कुशाग्र मोहन, कशीश जैन, सुयोग वाघ, निखिल दीक्षित आणि विक्रमादित्य कुलकर्णी यांसह अनेक नामांकित खेळाडू स्पर्धेत उतरले होते.याच बरोबर महिला गटात वूमन इंटरनॅशनल मास्टर साक्षी चितलांगे आणि वूमन इंटरनॅशनल मास्टर ऋतुजा बक्षी यांनी सहभाग घेतला.

बुद्धिबळाच्या प्रसारासाठी आणि नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्राई कन्स्ट्रक्शन ग्रुप ऑफ कंपनीज, जयंत गोखले चेस इन्स्टिट्यूट, ओम घुले लेगसीज एलएलपी, उद्योजक संजीव जगताप आणि निष्कर्ष लॅबोरेटरीचे डॉ. राम साठ्ये यांनी स्पर्धेला सहकार्य केले.यावेळो स्पर्धेचे उद्घाटन 

भारताचे चौथे ग्रँडमास्टर, ध्यानचंद पुरस्कार विजेते अभिजीत कुंटे खेळाडूंना  मार्गदर्शन करताना
भारताचे चौथे ग्रँडमास्टर, ध्यानचंद पुरस्कार विजेते अभिजीत कुंटे खेळाडूंना मार्गदर्शन करताना


, वूमन इंटरनॅशनल मास्टर व श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या मृणालिनी कुंटे, चंद्राई कन्स्ट्रक्शनचे संचालक राकेश बेलदरे, दोन वेळा श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते व बुद्धिबळ प्रशिक्षक जयंत गोखले आणि साकार फाउंडेशनचे अध्यक्ष शरद जगताप यांच्या हस्ते झाले.

व साकार फाउंडेशनचे विश्वस्त जीवन धर्माधिकारी, संतोष नेर्लेकर, गौरी देव, प्रिया जगताप, कविता धर्माधिकारी, उद्योजक संजीव जगताप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सिंहगड भाग संघचालक सचिनजी नागपुरे, विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र मंत्री किशोर चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, बुद्धिबळ प्रशिक्षक, खेळाडू आणि पालक उपस्थित होते.

सकारात्मक मानसिकता आणि सातत्यपूर्ण सरावाचे महत्त्व

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांनी बुद्धिबळात सर्वोच्च यश मिळवण्यासाठी सकारात्मक मानसिकता, शिस्तबद्ध सराव, स्पर्धांमध्ये सातत्याने सहभाग तसेच प्रशिक्षक आणि पालकांचे मार्गदर्शन यांची सांगड आवश्यक असल्याचे सांगितले.बुद्धिबळ हा खेळ केवळ स्पर्धात्मक कामगिरीपुरता मर्यादित नसून तो व्यक्तिमत्त्व विकासालाही हातभार लावतो, असे प्रशिक्षक जयंत गोखले यांनी नमूद केले. बुद्धिबळपटू अभिमन्यु पुराणिक सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी होत असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

यानंतर अभिजीत कुंटे आणि मृणालिनी कुंटे यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर पहिली चाल करण्यात आली आणि स्पर्धेला सुरुवात झाली.

नऊ फेऱ्यांनंतर अभिमन्यु पुराणिक विजेता

सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेल्या स्पर्धेच्या नऊ फेऱ्या संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत पूर्ण झाल्या. फिडेच्या नियमानुसार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चीफ आर्बिटर दीप्ती शिदोरे, डेप्युटी चीफ आर्बिटर अमरीश टल्लू आणि इंटरनॅशनल आर्बिटर राजेंद्र शिदोरे यांच्या नेतृत्वाखाली १५ जणांच्या टीमने स्पर्धेचे कामकाज पाहिले.

स्पर्धेतील अव्वल मानांकित ग्रँडमास्टर अभिमन्यु पुराणिक यांनी सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली. त्यांनी सात फेऱ्यांमध्ये विजय मिळवत महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर आयएम कुशाग्र मोहन यांच्याविरुद्धच्या डावात आणि अंतिम फेरीत पुण्याच्या आयएम अक्षय बोरगावकर यांच्याविरुद्ध बरोबरी साधत पुराणिक यांनी ९ पैकी ८ गुणांची कमाई केली आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

अक्षय बोरगावकर आणि नाशिकचा कैवल्य नागरे यांनी प्रत्येकी साडेसात गुण मिळवत अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले.

चार लाख रुपयांची पारितोषिके

स्पर्धेतील विविध गटांतील विजेत्यांसाठी एकूण ४ लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली होती. विजेता ग्रँडमास्टर अभिमन्यु पुराणिक यांना १ लाख रुपये आणि ‘बुद्धिमतां वरिष्ठम्’ करंडक प्रदान करण्यात आला.

अक्षय बोरगावकर यांना ६५ हजार रुपये, तर कैवल्य नागरे यांना ४१ हजार रुपये व करंडक देण्यात आला.मुख्य १५ क्रमांकांच्या पारितोषिकांसह ७, ९, ११, १३ आणि १५ वर्षांखालील मुले व मुली, १४०० ते २००० रेटिंगमधील चार गट, १६ वर्षांवरील महिला, ५५ वर्षांवरील ज्येष्ठ खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच रेटिंग नसलेल्या खेळाडूंसाठी विशेष प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात आली.‘यत्न तो देव जाणावा’ या विचाराला अधोरेखित करणारे विशेष समर्थ रामदास स्वामी प्रथम पुरस्कारही देण्यात आले. याशिवाय ‘बेस्ट पुणे’, ‘बेस्ट महाराष्ट्र’, ‘बेस्ट स्कूल’ आणि ‘बेस्ट अकॅडमी’ अशा विशेष पुरस्कारांचाही समावेश होता.एकूण ७१ ट्रॉफीज आणि ११७ मेडल्स तसेच क्रमांकानुसार रोख पारितोषिके देण्यात आली.पारितोषिक वितरण समारंभास चंद्राई कन्स्ट्रक्शन ग्रुप ऑफ कंपनीजचे मॅनेजिंग डायरेक्टर मंगेश बेलदरे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी बुद्धिबळाचा खेळ, खेळाडू, स्पर्धेचे आयोजन आणि त्यातील विविध बाबी जाणून घेत उपस्थितांशी संवाद साधला.महाराष्ट्र चेस असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र कोंडे, जयंत गोखले, आयटी तज्ज्ञ दीप्ती गोखले, ऋषिकेश गोखले, आयटी व्यावसायिक संदीप गोहाड, बांधकाम व्यावसायिक जितेंद्र कोटकर आणि साकार फाउंडेशनचे विश्वस्त यांच्या हस्ते विविध गटांतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.स्पर्धेदरम्यान खेळाडू आणि पालकांसाठी दिवसभर थांबण्याची व्यवस्था, अल्पोपहार व भोजनाची सुविधा करण्यात आली होती. गुलमोहर बँक्वेट हॉलचा परिसर आणि स्पर्धेच्या आयोजनातील व्यवस्थेबद्दल पालक व निमंत्रितांनी समाधान व्यक्त केले.

सिंहगड रस्ता परिसरात विविध उपक्रमांची नांदी

सिंहगड रस्ता परिसरात क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सर्वांगीण विकासासाठी साकार फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. बुद्धिबळ स्पर्धा ही त्याची सुरुवात असल्याचे साकार फाउंडेशनचे अध्यक्ष शरद जगताप, कोषाध्यक्ष सीए कौस्तुभ देव, विश्वस्त व संगीतकार जीवन धर्माधिकारी आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संस्था, पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू, पालक आणि स्वयंसेवकांचे साकार फाउंडेशनचे कौस्तुभ देव यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या

सिंहगड पत्रकार संघ डिजिटल मीडियाची नवीन कार्यकारिणी जाहीर

मानवी हक्क आयोगाच्या आदेशाने पुणे पोलिसांवर गंभीरप्रश्नचिन्ह

पुणे महानगरपालिका व महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुनवडी ते पुणे’ उपक्रम

पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या मार्गात यंदा बदल.