बारामती : वकिलांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासह वकील परिवारातील एकजूट वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित राज्यस्तरीय ‘बारामती लॉयर्स मॅरेथॉन’मध्ये ५०० हून अधिक वकील सहभागी झाले. बारामती बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सचिन वाघ यांच्या संकल्पनेतून आणि कार्यकारिणीच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
वकिली व्यवसायातील व्यस्त दिनक्रमामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढणे अनेकांना आव्हानात्मक ठरते. या पार्श्वभूमीवर वकिलांना व्यायामाची सवय लागावी आणि धावण्याविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने मॅरेथॉनचे नियोजन करण्यात आले होते.
स्पर्धेच्या तयारीसाठी नोंदणी, बिब किट वितरण, योगासने, झुंबा सत्रे आणि सकाळच्या धावण्याच्या सरावाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला मर्यादित असलेला सहभाग वाढत जाऊन अंतिम टप्प्यात ५०० हून अधिक वकील या उपक्रमाशी जोडले गेले. वयाची साठी ओलांडलेल्या ज्येष्ठ वकिलांसह महिला वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि दौंड, इंदापूरसह विविध भागांतून आलेल्या वकिलांनीही सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत ५ आणि १० किलोमीटर अशा दोन अंतरांसाठी महिला व पुरुष गटांत स्पर्धा झाली.
लोकशाहीच्या रक्षणासाठी पुण्यात मोर्चामहाराष्ट्र · 3 दिवसांपूर्वी
सिंहगड भागात राष्ट्र सेविका समितीचे सघोष पथसंचलनसांस्कृतिक · 27 Oct 2026५ किलोमीटर महिला गटात गौरी काटे यांनी प्रथम, अंजली पिसळ यांनी द्वितीय, तर प्रगती रोटे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. पुरुष गटात अमोल बनसोडे प्रथम, सागर वैद्य द्वितीय, तर ऋषिकेश कोथमिरे तृतीय ठरले.
१० किलोमीटर महिला गटात अनिता राजमाने यांनी प्रथम, सरस्वती करचे यांनी द्वितीय, तर शिवानी सपकाळ यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. पुरुष गटात प्रथमेश पानसे यांनी प्रथम, धीरज राणवारे यांनी द्वितीय, तर सागर जबंगी यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
या आयोजनात ॲड. सचिन वाघ यांच्यासह ॲड. अमोल वाबळे, बारामती बार असोसिएशनची कार्यकारिणी, आयोजन समिती, स्वयंसेवक, स्थानिक धावपटू, प्रायोजक आणि प्रशिक्षक यांनी योगदान दिले. नियोजनबद्ध सराव सत्रे आणि सहभागींच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद मिळाला.
वकिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासह परस्परांतील सहकार्य आणि एकजूट वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित झाले.




