पुणे,नऱ्हे : विधी क्षेत्रात करिअरच्या विविध संधी उपलब्ध असून, बदलत्या सामाजिक परिस्थितीत कायद्याचे महत्त्व वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कायद्याचा सखोल अभ्यास करून या क्षेत्रातील संधी, आव्हाने आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात, असे आवाहन झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. राजेश कुमार यांनी केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने विधी व्यवसाय आणि करिअरच्या संधी या विषयावर दुसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन नऱ्हे येथील शैक्षणिक संकुलात करण्यात आले होते. या अधिवेशनात न्या. राजेश कुमार प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्या. श्रीकांत कुलकर्णी, पुणे कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश न्या. एस. एन. रुक्मे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर आणि विभागप्रमुख डॉ. सपना देव उपस्थित होते.
अधिवेशनादरम्यान बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या उपाध्यक्ष ॲड. रंजना भोसले, माजी अध्यक्ष व सदस्य ॲड. विठ्ठल कोंडे देशमुख, सदस्य ॲड. अहमदखान पठाण, सदस्य व माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र बाबुराव उमाप, सदस्य ॲड. राजेंद्र अनभुले, सदस्य ॲड. विकास ढगे पाटील, सदस्य ॲड. माधवी बाळ पोतदार आणि सदस्य ॲड. गणेश शिरसाट यांचा सन्मान करण्यात आला.
न्या. राजेश कुमार म्हणाले, की कायद्याशिवाय दैनंदिन जीवनाची कल्पना करता येत नाही. कायद्याचे स्वरूप आणि व्याप्ती समजून घेताना समाजव्यवस्था, मानवी व्यवहार आणि राज्यव्यवस्थेतील त्याची भूमिका लक्षात घेणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजनिर्मितीचे कार्य केले. समाजाला संघटित करून सामूहिकपणे काम करण्याची परंपरा महाराष्ट्राच्या संस्कृतीत रुजलेली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
काळी आई वाचवा, तरच पुढची पिढी टिकेल!शिक्षण · 27 Oct 2026
नऱ्हे परिसरात १०० कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून ८७ लाख ६१ हजाराची फसवणूकशिक्षण · 12 Oct 2026
राष्ट्रपुरुषांना भव्य चित्रांद्वारे अनोखी मानवंदनाशिक्षण · 02 Oct 2026व्यावसायिक यशासाठी संयम आणि तत्त्वनिष्ठा आवश्यक
न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी विधी क्षेत्रातील व्यावसायिक वाटचालीसाठी संयम, मेहनत आणि तत्त्वनिष्ठा महत्त्वाची असल्याचे सांगितले. अनेक वर्षांच्या परिश्रमांतून व्यावसायिक विश्वासार्हता निर्माण होते. सुरुवातीच्या काळात केलेल्या कामाला लगेच प्रसिद्धी किंवा ओळख मिळेलच असे नाही. त्यामुळे अडचणींमुळे खचून न जाता सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
यश मिळवण्याची इच्छा ही न्याय्य गोष्टींप्रती असलेल्या वचनबद्धतेपेक्षा मोठी असू नये, असे स्पष्ट करत त्यांनी विधी व्यवसायातील मूलभूत तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले. व्यावसायिक जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाताना दबावाखाली निर्णय घेणे किंवा शॉर्टकटचा अवलंब करणे टाळले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
न्या. एस. एन. रुक्मे यांनी आदर्श समाजनिर्मितीत वकिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. समाजात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी वकिलांनी पुढाकार घ्यावा. समाजहिताचे रक्षण करण्यासाठी स्वतःची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे. वकिलांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
सामाजिक भान असलेले कायदेतज्ज्ञ घडवण्यावर भर
ॲड. शार्दुल जाधवर यांनी संस्थेच्या शैक्षणिक उद्दिष्टांची माहिती दिली. केवळ परीक्षा उत्तीर्ण होणारे विद्यार्थी घडवण्यापेक्षा सक्षम, व्यावसायिकदृष्ट्या आत्मविश्वासपूर्ण आणि सामाजिक भान असलेले कायदेतज्ज्ञ तयार करण्यावर संस्थेचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
विधी शाखेची पदवी ही केवळ शैक्षणिक पात्रता नसून समाज आणि देशाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देणारी बाब आहे. विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी ओळखून आपल्या ज्ञानाचा उपयोग न्यायव्यवस्था आणि समाजाच्या हितासाठी करावा, असेही त्यांनी नमूद केले.
विधी क्षेत्रातील करिअरच्या संधी, व्यावसायिक मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि कायद्याच्या अभ्यासाचे महत्त्व या विषयांवर अधिवेशनात मार्गदर्शन करण्यात आले.



