📅 12 October 2026, Monday
👤 एडिटर लॉगिन ✉️ संपर्क
शिक्षण

नऱ्हे परिसरात १०० कोटींच्या कर्जाचे आमिष दाखवून ८७ लाख ६१ हजाराची फसवणूक

पुणे :शैक्षणिक संस्थेच्या विस्तारासाठी १०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी ८७ लाख ६१ हजार रुपये घेतल्याची आणि त्यानंतर पैसे परत न करता फसवणूक केल्याची तक्रार पुण्यातील नऱ्हे येथील शिक्षण संस्थाचालक प्रा. डॉ. सुधाकर जाधवर यांनी केली आहे. या प्रकरणी नऱ्हे पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला असून, API समीर चव्हाण पुढील तपास करीत आहेत. तसेच अनुप दिवेकर, आनंद दिवेकर यांच्यासह गायकवाड या तिघांवर तक्रारीत आरोप करण्यात आले आहेत.

प्रा.डॉ. सुधाकर जाधवर हे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संचालक असून, त्यांच्या संस्थेच्या विस्तारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता होती. त्यातून कर्ज मिळविण्याचे प्रयत्न सुरू असताना संबंधित व्यक्तींशी त्यांची ओळख झाली. या ओळखीतून १०० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आणि त्यासाठी वेळोवेळी पैसे घेण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.


या प्रकरणात प्रा.डॉ.जाधवर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, २०२० मध्ये त्यांनी प्रेरणा प्रतिष्ठान नावाची शिक्षण संस्था विकत घेतली या साठी कर्जाची आवश्यकता होती संस्था तोट्यात असल्यामुळे त्यांनी वैयक्तिक कर्जासाठी दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी अनुप दिवेकर, आनंद दिवेकर आणि गायकवाड  या तिघांनी त्यांची भेट घेतली. संबंधित व्यक्तींनी महाराष्ट्रातील गरजू लोकांना मदत करण्यासाठी शांतराम महाराज ट्रस्टच्या माध्यमातून काम सुरू असल्याचे सांगितले. अनुप दिवेकर हे ट्रस्टचे बेअरर असल्याचेही त्यांना सांगण्यात आल्याचा दावा आहे.या भेटीदरम्यान ट्रस्टच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यासाठी कर्जाच्या रकमेतील १० टक्के रक्कम आगाऊ द्यावी लागेल, असे सांगण्यात आल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे. संबंधित व्यक्तींवर विश्वास ठेवून त्यांनी संबंधित व्यक्तींना तसेच त्यांच्या सांगण्यावरून अन्य व्यक्तींना वेगवेगळ्या बँक खात्यांतून पैसे हस्तांतरित करण्यात आले. काही रक्कम रोख स्वरूपात देण्यात आल्याचेही त्यांनी या तक्रारीमध्ये म्हटले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, इतर बँक खाती आणि गुगल पेच्या माध्यमातून झालेल्या व्यवहारांचा उल्लेख असून याच य सर्व व्यवहारांतून एकूण ८७ लाख ६१ हजार रुपये दिल्याचा दावा प्रा.डॉ. जाधवर यांनी केला आहे. या व्यवहारांचे बँक स्टेटमेंट, ऑनलाइन पैसे पाठविल्याच्या नोंदी आणि अन्य कागदपत्रे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहेत.

तसेच प्रा.डॉ. सुधाकर जाधवर यांच्या म्हणण्यानुसार, पैसे दिल्यानंतरही अपेक्षित कर्ज मिळाले नाही. संबंधित व्यक्तींनी कर्जाची रक्कम लवकरच उपलब्ध होईल, असे सांगून वेळोवेळी आश्वासने दिली. त्यानंतर डॉ. जाधवर  यांनी दिलेली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली मात्र अपेक्षित रक्कम परत मिळाली नाही. कर्ज मंजूर करून देण्याच्या आश्वासनावर विश्वास ठेवून पैसे दिले असून संबंधित व्यक्तींशी झालेल्या व्यवहारांचा तपशील, बँक खात्यांमधून केलेले आर्थिक व्यवहार आणि धनादेशांचा उल्लेख पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे.  तक्रारीत ५० कोटी, २५ कोटी, १० कोटी आणि पाच कोटी रुपयांच्या धनादेशांचा उल्लेख करण्यात आला असून हे धनादेश बँकेत जमा केले असता वटले नाहीत तसेच कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेतल्यानंतर प्रत्यक्ष कर्ज न मिळणे आणि पैसेही परत न मिळणे, यामुळे आपली आणि आपल्या संस्थेची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला  आर्थिक फसवणूक झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.


 ट्रस्टची भूमिका आणि आर्थिक व्यवहार तपासाच्या केंद्रस्थानी

या प्रकरणात १०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन नेमके कोणत्या आधारावर देण्यात आले, त्यासाठी पैसे कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले, तसेच संबंधित ट्रस्टचा या व्यवहारांशी काय संबंध आहे, हे तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.

तक्रारदाराने दिलेल्या रकमेचा संपूर्ण हिशेब, बँक खात्यांतील नोंदी, ऑनलाइन व्यवहार, धनादेश आणि संबंधित व्यक्तींची भूमिका यांची पडताळणी तपासात महत्त्वाची ठरणार आहे. धनादेश वटले नसल्यामागील कारणे आणि संबंधित आर्थिक व्यवहारांचे स्वरूप यांचाही तपास होण्याची शक्यता आहे.


 API समीर चव्हाण यांच्याकडे तपास

या प्रकरणी नऱ्हे पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला असून API समीर चव्हाण पुढील तपास करीत आहेत. तक्रारीतील आरोपांच्या अनुषंगाने आर्थिक व्यवहारांची पडताळणी आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासली जाणार आहे.दरम्यान, या प्रकरणात तक्रारदाराने केलेले आरोप हे तपासाच्या अधीन आहेत. संबंधित व्यक्तींची बाजू आणि पोलिस तपासातून समोर येणारे निष्कर्ष अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

संबंधित बातम्या

नऱ्हेतील अंगणवाडीला मिळणार नवे रूप

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे प्रभावी नियोजन कसे करावे?

स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानला ‘संपदा समाजकल्याण पुरस्कार २०२६’ प्रदान

नऱ्हेतील घरफोडीचा गुन्हा उघड; तिघांना अटक