📅 03 October 2026, Saturday
👤 एडिटर लॉगिन ✉️ संपर्क
शिक्षण

राष्ट्रपुरुषांना भव्य चित्रांद्वारे अनोखी मानवंदना

पुणे दिनांक ०२ : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि जाधवर फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, पुणे यांच्या वतीने अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकौशल्यातून तब्बल ४० बाय ८० फूट आकारातील दोन भव्य चित्रे साकारत राष्ट्रपुरुषांना मानवंदना दिली.

या उपक्रमात संस्थेतील तब्बल २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी सलग आठवडाभर मेहनत घेत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची भव्य चित्रे साकारली. मोठ्या आकारातील या चित्रांच्या माध्यमातून राष्ट्रपुरुषांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त केवळ पारंपरिक पद्धतीने अभिवादन न करता विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि सामूहिक सहभागाला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करत चित्रनिर्मितीसाठी आवश्यक तयारी केली. आठवडाभराच्या परिश्रमानंतर साकारलेली ही दोन्ही भव्य चित्रे उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरली.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रपुरुषांचे जीवन, कार्य आणि विचार यांची ओळख करून देण्याबरोबरच सामूहिक काम, शिस्त, नियोजन आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले.संस्थेचे उपाध्यक्ष  ॲड.शार्दूलराव जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत राष्ट्रपुरुषांच्या विचारांशी त्यांचा संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला दिशा दिली, तर लालबहादूर शास्त्री यांनी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशसेवेचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या भव्य चित्रांमधून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.सुमारे २०० विद्यार्थ्यांचा सहभाग, आठवडाभराचे परिश्रम आणि ४० बाय ८० फूट आकारातील दोन भव्य चित्रे यामुळे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचा हा उपक्रम लक्षवेधी ठरला. विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेसोबतच राष्ट्रपुरुषांच्या विचारांविषयी आदर आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम ठरला.

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे प्रभावी नियोजन कसे करावे?

नवले चौक ते वडगाव बुद्रुक परिसरातील वाहतूक प्रश्नांवर संयुक्त पाहणी; १५ दिवसांत कार्यवाहीची मागणी

‘पुण्याचा गणेशोत्सव : एक वैभवशाली परंपरा’; १३वे मासिक व्याख्यान उत्साहात संपन्न

सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात; २.१० कोटींचा निधी मंजूर