📅 30 September 2026, Wednesday
👤 एडिटर लॉगिन ✉️ संपर्क
पुणे

सिंहगड पत्रकार संघ डिजिटल मीडियाची नवीन कार्यकारिणी जाहीर

पुणे : सिंहगड पत्रकार संघाच्या नियंत्रणाखाली सिंहगड पत्रकार संघ डिजिटल मीडियाची नवीन कार्यकारिणी रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. डिजिटल माध्यमांमध्ये कार्यरत पत्रकारांना संघटित व्यासपीठ उपलब्ध करून देणे, स्थानिक प्रश्न आणि नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे तसेच सामाजिक विषयांचे जबाबदारीने आणि वस्तुनिष्ठ वृत्तांकन करण्याचा उद्देश यावेळी व्यक्त करण्यात आला.

सिंहगड पत्रकार संघाचे अध्यक्ष मिलिंद पानसरे, उपाध्यक्ष जागृती कुलकर्णी, सचिव कल्याणराव आवताडे, खजिनदार निलेश चांदगुडे, सहसचिव जयंत जाधव, सदस्य शरणू जवळगी आणि तुकाराम वरक यांच्या नेतृत्वाखाली डिजिटल मीडिया विभागाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.


डिजिटल पत्रकारितेला संघटित व्यासपीठ

सध्या पारंपरिक माध्यमांसोबत डिजिटल माध्यमांचे महत्त्व वाढले आहे. स्थानिक पातळीवरील बातम्या, नागरी समस्या, प्रशासनाशी संबंधित घडामोडी, सामाजिक उपक्रम तसेच विविध क्षेत्रांतील माहिती नागरिकांपर्यंत वेगाने पोहोचविण्यात डिजिटल माध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

या पार्श्वभूमीवर डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना एकत्रित करून त्यांच्या कामाला संघटित स्वरूप देण्याचा प्रयत्न सिंहगड पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या माध्यमातून केला जाणार आहे.


नागरिकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करण्यावर भर

स्थानिक प्रशासन, पुणे महानगरपालिका, पोलिस प्रशासन, पीएमआरडीए तसेच अन्य शासकीय आणि निमशासकीय यंत्रणांशी समन्वय साधून नागरिकांच्या विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यावर भर देण्यात येणार आहे.

रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, पथदिवे, ड्रेनेज, अतिक्रमण, सार्वजनिक सुविधा, अपघातप्रवण ठिकाणे तसेच विकासकामांशी संबंधित प्रश्नांना डिजिटल माध्यमातून वाचा फोडण्याचे काम केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 तसेच डिजिटल माध्यमांमध्ये बातमी प्रसारित करण्याचा वेग मोठा असला तरी माहितीची अचूकता आणि विश्वासार्हता महत्त्वाची आहे. त्यामुळे बातमी प्रसिद्ध करण्यापूर्वी उपलब्ध माहितीची पडताळणी करणे, संबंधित व्यक्ती किंवा यंत्रणेची बाजू जाणून घेणे आणि अप्रमाणित माहितीला आळा घालणे यावर भर देण्यात येणार आहे.

फेक न्यूज, चुकीची माहिती आणि अफवांमुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ नयेत, यासाठी पत्रकारांनी जबाबदारीने डिजिटल माध्यमांचा वापर करण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.


पत्रकारांसाठी प्रशिक्षण -मार्गदर्शन व अडचणी 

डिजिटल पत्रकारांच्या कौशल्यविकासासाठी विविध प्रशिक्षणपर उपक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पत्रकारिता कौशल्य, बातमी लेखन, तथ्य पडताळणी, पत्रकारितेशी संबंधित कायदे, सोशल मीडिया वापर, मोबाईल पत्रकारिता, व्हिडिओ पत्रकारिता, फोटो आणि व्हिडिओ एडिटिंग तसेच डिजिटल कंटेंट निर्मिती यांसारख्या विषयांचा समावेश राहणार आहे.

याशिवाय पत्रकारांसाठी कार्यशाळा, चर्चासत्रे, मार्गदर्शन शिबिरे आणि संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

याच बरोबरीने डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना येणाऱ्या विविध अडचणी आणि प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिसरातील विविध डिजिटल माध्यमांमध्ये कार्यरत पत्रकारांना एकत्रित आणून परस्पर समन्वय वाढविणे, अनुभवांची देवाणघेवाण करणे आणि पत्रकारितेतील बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती घेणे यावरही भर दिला जाणार आहे.

सामाजिक बांधिलकी, पत्रकारितेची मूल्ये आणि नागरिकांप्रती असलेली जबाबदारी जपत विश्वासार्ह, अचूक आणि वस्तुनिष्ठ डिजिटल पत्रकारितेचे व्यासपीठ उभारण्याचा संकल्प नवीन कार्यकारिणीने व्यक्त केला.


सिंहगड पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या नवीन कार्यकारिणीत पुढील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे :

(सर्व श्री)

- अध्यक्ष : प्रकाश यादव – व्हिजन महाराष्ट्र

- उपाध्यक्ष : विशाल भालेराव – पुणे क्राईम

- उपाध्यक्ष : कैलास गायकवाड – टॉप न्यूज पुणे 

- कार्याध्यक्ष : ज्ञानेश्वर दळवी – नागरिक शस्त्र

- सचिव : गजानन मेनकुदळे – डिजिटल पुणे न्यूज

- सहसचिव : अमोल उदमले – सी २४ तास

- खजिनदार : ज्ञानेश्वर जाधव – महाराष्ट्र दर्पण

- संपर्कप्रमुख : अतुल मुळे – एमएच उपनगर

- सदस्य : सुरेखा मते – आरंभपर्व

- सदस्य : किरण बनसोडे – नागरिक शस्त्र

- सदस्य : विशाल वाघमारे – नागरिक शस्त्र

कार्यकारिणी जाहीर करताना सिंहगड पत्रकार संघाचे अध्यक्ष मिलिंद पानसरे, उपाध्यक्ष जागृती कुलकर्णी, सचिव कल्याणराव आवताडे, खजिनदार निलेश चांदगुडे, सहसचिव जयंत जाधव, सदस्य शरणू जवळगी, तुकाराम वरक, लक्ष्मण साबळे यांच्यासह नवीन कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते.

डिजिटल पत्रकारितेसाठी नवे व्यासपीठ---

सिंहगड पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील डिजिटल पत्रकारांना एकत्र आणण्याबरोबरच नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवादासाठी माध्यम म्हणून काम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आगामी काळात स्थानिक प्रश्नांचे सातत्याने वृत्तांकन, पत्रकारांसाठी प्रशिक्षण उपक्रम आणि डिजिटल माध्यमातील बदलांनुसार पत्रकारिता कौशल्य विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या

पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या मार्गात यंदा बदल.

पुण्यात बापटांना धक्का.

नांदेड सिटीत रंगला स्व. निवृत्ती हगवणे पाटील स्मृती - रामराज्य जेष्ठ नागरिक कर्मयोगी सन्मान सोहळा

गरजू रुग्णांसाठी ‘वैद्यकीय मदत कक्षा’ची स्थापना