पुणे दिनांक ०१ : नवले चौक ते भूमकर चौक, नऱ्हे स्मशानभूमी, आशीर्वाद हॉटेल, विश्वास हॉटेल आणि वीर बाजी पासलकर चौक परिसरातील वाहतूक व नागरी सुविधांशी संबंधित प्रश्नांच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि रिलायन्सच्या अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान विविध ठिकाणच्या समस्या प्रत्यक्ष पाहून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना व मागण्या करण्यात आल्या.नगरसेवक हरिदास चरवड यांच्या उपस्थितीत झालेल्या या पाहणीमध्ये वाहतूक कोंडी, सर्व्हिस रोड, रस्ते रुंदीकरण, अतिक्रमणे, पार्किंग, स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग तसेच महामार्गालगतच्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
नऱ्हे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गाबाबत सूचना
नऱ्हे स्मशानभूमीत जाण्यासाठी आवश्यक रॅम्प व गेटची व्यवस्था करण्याबरोबरच संरक्षक जाळी बसविणे आणि पडलेली संरक्षक भिंत तातडीने बांधण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांना स्मशानभूमीकडे जाण्यासाठी सुरक्षित व सुलभ मार्ग उपलब्ध करून देण्याची आवश्यकता यावेळी मांडण्यात आली.तसेच नऱ्हे स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या सर्व्हिस रोडच्या कामाबाबतही पाहणी करण्यात आली. हा सर्व्हिस रोड एका बाजूने महामार्गाला जोडण्याबरोबरच दुसऱ्या बाजूने समांतर सर्व्हिस रोडच्या माध्यमातून भूमकर चौकाकडे जोडण्याची मागणी करण्यात आली.व आवश्यक ठिकाणी Retaining Wall आणि Exitची व्यवस्था करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. यासाठी संबंधित सल्लागारांनी तातडीने आवश्यक नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली.
भूमकर चौक अंडरपासच्या कामाला गती
भूमकर चौकातील अंडरपासच्या कामाबाबतही पाहणीदरम्यान चर्चा करण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या प्रयत्नातून या कामाला गती मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सिंहगड पत्रकार संघ डिजिटल मीडियाची नवीन कार्यकारिणी जाहीरपुणे · 5 दिवसांपूर्वी
मानवी हक्क आयोगाच्या आदेशाने पुणे पोलिसांवर गंभीरप्रश्नचिन्हपुणे · 24 Sep 2026
पुणे महानगरपालिका व महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुनवडी ते पुणे’ उपक्रमपुणे · 22 Sep 2026येत्या १५ दिवसांत अंडरपासच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती पाहणीदरम्यान देण्यात आल्याचे सांगण्यात आले. सुमारे १५ मीटर रुंदी आणि आवश्यक उंचीसह नवीन अंडरपास करण्याबाबत तांत्रिक पाहणी करण्यात आली. भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन पर्यायी अंडरपास किंवा अतिरिक्त लेनची शक्यता तपासण्याची मागणीही करण्यात आली.
नवले चौकातील अतिक्रमणे हटविण्याची मागणी
नवले चौक परिसरातील अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आणून देण्यात आले. चौकातील अतिक्रमणे हटवून दोन्ही बाजूंना आवश्यक रुंदीचा रस्ता उपलब्ध करून देण्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली.
आशीर्वाद हॉटेल परिसरातील रस्ता रुंदीकरण
आशीर्वाद हॉटेल परिसरातील वाहतुकीच्या समस्येचाही यावेळी आढावा घेण्यात आला. वाहतुकीला अडथळा ठरणारे अनावश्यक पावसाळी गटार काढून त्या ठिकाणी रस्त्याची रुंदी वाढविण्याची मागणी करण्यात आली. याबाबत १५ दिवसांत कार्यवाही करण्याचे सांगण्यात आल्याचे चरवड यांनी नमूद केले.
विश्वास हॉटेल चौकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना
विश्वास हॉटेल चौक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन करण्याची मागणी करण्यात आली. पुढील गुरुवारपर्यंत वाहतूक नियोजनाचा आराखडा तयार करून प्रत्यक्ष पाहणीच्या माध्यमातून आवश्यक निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
वीर बाजी पासलकर चौकातील लेन रुंदीकरण
वीर बाजी पासलकर चौक परिसरातील महामार्ग पुलाखालील लेनची रुंदी वाढविण्याची मागणी करण्यात आली. जड वाहनांना कोणताही अडथळा न येता वळता यावे, यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची सूचना देण्यात आली.वाहतुकीस अडथळा ठरणारी झाडे आवश्यक परवानग्या घेऊन हटविण्याबाबतही संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.
वडगाव बुद्रुक स्मशानभूमीसाठी स्वतंत्र पार्किंगची मागणी
वडगाव बुद्रुक स्मशानभूमी परिसरात भविष्यातील गरज लक्षात घेऊन स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय रस्त्यावर होणारे अनधिकृत पार्किंग आणि लक्झरी तसेच प्रवासी वाहने रस्त्यावर थांबल्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्नही यावेळी मांडण्यात आला.प्रवासी वाहतुकीसाठी नियोजनबद्ध आणि स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
१५ दिवसांत कार्यवाहीची मागणी
या सर्व प्रश्नांवर तातडीने प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. १५ दिवसांत संबंधित प्रश्नांवर कार्यवाही झाली नाही, तर नवले पूल परिसरात किंवा वीर बाजी पासलकर चौकात उपोषण करण्याचा इशारा अधिकाऱ्यांसमोर देण्यात आल्याचे नगरसेवक हरिदास चरवड यांनी सांगितले.नागरिकांच्या वाहतुकीशी आणि नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न प्रलंबित न ठेवता प्रत्यक्ष पाहणी, ठोस नियोजन आणि निश्चित कालमर्यादेत कार्यवाही करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.




