📅 21 September 2026, Monday
👤 एडिटर लॉगिन ✉️ संपर्क
पुणे

स्वामीनारायण लँडमार्कचा पहिलाच गणेशोत्सव उत्साहात साजरा

नऱ्हे : नऱ्हे येथील नव्याने विकसित झालेल्या स्वामीनारायण लँडमार्क सोसायटीमध्ये यंदा प्रथमच गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून, रहिवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सोसायटीतील सर्व सदस्यांनी एकजुटीने गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


गणेशोत्सवाचे नियोजन करण्यासाठी संचालक मंडळाच्या वतीने स्वतंत्र उत्सव कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. उत्सवाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी या कमिटीवर सोपविण्यात आली असून, त्यांना कार्यक्रमांचे नियोजन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. त्यानुसार सौ. कल्पना पाटील, अमोल निकम, जयदीप रुगले तसेच श्री. ढाणे यांच्या पुढाकाराने गणेशोत्सवातील विविध उपक्रमांना सुरुवात झाली आहे. या उपक्रमांना सोसायटीतील सर्व सदस्यांचेही सहकार्य लाभत आहे.


गणेशोत्सवाच्या दुसऱ्याच दिवशी, १५ सप्टेंबर रोजी मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा तसेच भारतीय संस्कृती आणि संस्कारांची जोपासना व्हावी, या उद्देशाने ‘श्लोक व स्तोत्र पठण तसेच वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते.


या स्पर्धेत सोसायटीतील सुमारे १३ चिमुकल्या मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुलांनी श्लोक व स्तोत्र पठणाबरोबरच विविध विषयांवर वक्तृत्व सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. या उपक्रमामुळे मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्याबरोबरच त्यांच्यामध्ये संस्कृती आणि परंपरांविषयीची आवड निर्माण होण्यास मदत होत आहे.


या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सायास फाउंडेशनचे सचिन देशमुख यांनी काम पाहिले. त्यांनी सहभागी मुलांचे मार्गदर्शनही केले.


दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता सांस्कृतिक स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम तसेच मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम आयोजित करण्याचा निर्णय सोसायटीच्या उत्सव कमिटीने घेतला आहे. पहिल्याच गणेशोत्सवाला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता स्वामीनारायण लँडमार्कमध्ये यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरण्याची चिन्हे आहेत.

संबंधित बातम्या

गरजू रुग्णांसाठी ‘वैद्यकीय मदत कक्षा’ची स्थापना

धायरी येथील 'शिववंदना मित्र परिवारा'तर्फे कसबा गणपती दर्शन व शिव-शंभू वंदनेचा उत्साही कार्यक्रम संपन्न!

पुण्यातील पावसाळी पर्यटन: भेट देण्यासारखी ५ सुंदर ठिकाणे