मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 5 हजार रुपये अग्रीम रक्कम जमा करण्याची घोषणा केली आहे. दुष्काळ निवारणाची संपूर्ण प्रक्रिया दिवाळीपूर्वी पूर्ण करणं शक्य नसल्याने सरकारने हा तातडीचा निर्णय घेतल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
ते मुंबईत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. बैठकीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासह पाणीटंचाई आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आल्याचे फडणवीसांनी सांगितले.
दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी मंत्रिमंडळाशी चर्चा करून अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रुपये जमा केले जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. साधारणपणे दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया नोव्हेंबरच्या अखेरीस पूर्ण होते. मात्र, यंदाची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने आधीच दुष्काळ जाहीर केला असून, त्यासंदर्भातील शासन निर्णयही ऑक्टोबरमध्ये काढण्यात आला आहे. तरीही दुष्काळ निवारणाच्या प्रक्रियेतील सर्व औपचारिकता दिवाळीपूर्वी पूर्ण होणं कठीण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यातील 305 तालुके दुष्काळग्रस्त
राज्यातील दुष्काळाची व्याप्ती लक्षात घेऊन आणखी 40 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांची एकूण संख्या 305 झाली आहे. या भागांतील शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्तांसाठी लागू असलेल्या 12 सवलतींचा लाभ मिळत राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. याशिवाय, शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कमही जमा होत असल्याचं त्यांनी सांगितलं. दुष्काळामुळे शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर निर्माण झालेला ताण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
डीजे-डॉल्बीच्या आवाजावर मुंबई उच्च न्यायालयाचा बडगामुंबई · 4 दिवसांपूर्वी
राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू- मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे आव्हानमुंबई · 26 Sep 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानाअंतर्गत भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान शिबीरमुंबई · 23 Sep 2026मराठवाड्यात पाणीटंचाई गंभीर; टँकरची संख्या वाढवणार
दुष्काळासोबतच राज्यातील अनेक भागांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. विशेषतः मराठवाड्यातील भूजलपातळी तीन मीटरपेक्षा खाली गेल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी टँकरची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठवाड्यात गरजेनुसार टँकर उपलब्ध करून दिले जातील. तसेच, टँकरच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. यामुळे पाणीपुरवठ्यावर देखरेख ठेवण्यास मदत होईल, अशी सरकारची भूमिका आहे. पाणीटंचाईच्या काळात पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहावं, याला सरकार प्राधान्य देत असल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. याच अनुषंगाने राज्यात 16 हजार बेकायदा पाणी जोडण्या तोडण्यात आल्याची माहितीही यावेळी फडणवीसांनी दिली.




