मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी राज्य सरकारने निर्णयप्रक्रियेला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, धरणांमधील पाणीसाठा आणि शेतीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येणार आहे. या उपसमितीला मंत्रिमंडळाचे अधिकार देण्यात येणार असून, विविध भागांतून प्राप्त होणाऱ्या परिस्थितीच्या अहवालाच्या आधारे दुष्काळसदृश भाग, मदतीचे स्वरूप आणि आवश्यक उपाययोजनांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
‘या’ दिवशी प्राथमिक अधिसूचना
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची प्रतीक्षा न करता राज्य सरकारकडून आवश्यक मदत सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. दुष्काळसदृश परिस्थितीबाबतची प्राथमिक अधिसूचना येत्या शनिवारपर्यंत जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील परिस्थितीची प्राथमिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, बुधवारपासून संबंधित भागांमध्ये पंचनामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सोयाबीन, मका आणि कापूस पिकांना फटका
अपुरा अथवा प्रतिकूल पाऊस झाल्याने राज्यातील काही भागांमध्ये सोयाबीन, मका आणि कापूस या पिकांना मोठा फटका बसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. कोकणातील भातशेतीवरही पावसाच्या परिस्थितीचा विपरीत परिणाम झाल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडून प्रत्यक्ष पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस बुधवारपासून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या भागांचा दौरा करून पाहणी करणार आहेत. तसेच मंत्र्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (NDRF) निकषांनुसार केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रभावित भागांमध्ये पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.
पुढील ७ ते ८ महिन्यांसाठी पाणी नियोजन
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी सात ते आठ महिन्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. महानगरपालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयातून हे नियोजन केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ उपसमितीत कोणाचा समावेश?
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीत गिरीष महाजन, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे, जयकुमार गोरे, प्रताप सरनाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद जाधव पाटील आदी मंत्र्यांचा समावेश आहे. मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे समितीचे सदस्य सचिव असतील.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारची तयारी
दुष्काळसदृश परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी, पंचनामे, पाणी व चारा नियोजन तसेच केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव या माध्यमातून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे पंचनाम्यांनंतर परिस्थितीचे अधिक स्पष्ट चित्र समोर येणार असून, त्यानुसार मदतीचे स्वरूप निश्चित केले जाण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा
राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू- मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे आव्हानमुंबई · 2 दिवसांपूर्वी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानाअंतर्गत भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान शिबीरमुंबई · 5 दिवसांपूर्वी
गणेशोत्सवाच्या यशात पोलिसांचा मोलाचा वाटा; कोमल नवले यांच्याकडून पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभारराजकारण · 15 तासांपूर्वी




