📅 30 September 2026, Wednesday
👤 एडिटर लॉगिन ✉️ संपर्क
पुणे

पारमार्थिक सेवा प्रतिष्ठानचा तृतीय वर्धापन दिन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

आळंदी, दि. २७ सप्टेंबर २०२६ : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन भूमीत श्रीक्षेत्र आळंदी येथे पारमार्थिक सेवा प्रतिष्ठान, पुणे यांचा तृतीय वर्धापन दिन सोहळा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नामस्मरण, कीर्तन, प्रवचन, संतविचार तसेच विविध धार्मिक उपक्रमांनी सोहळ्याला आध्यात्मिक वातावरण लाभले.

“हेचि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ॥” या संतवचनाला केंद्रस्थानी ठेवून पारमार्थिक सेवा प्रतिष्ठानकडून गेल्या तीन वर्षांपासून संतविचार, नामभक्ती आणि वारकरी परंपरेच्या प्रचार-प्रसारासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यास महाराष्ट्राच्या विविध भागांतून संत, गुरुवर्य, वारकरी, साधक, पदाधिकारी, हितचिंतक आणि भाविक उपस्थित होते.

या प्रसंगी महाराष्ट्र वारकरी संघाचे अध्यक्ष ह. भ. प. आर. के. रांजणे महाराज, ज्ञानेश्वर माऊली ट्रस्टचे माजी अध्यक्ष ह. भ. प. अभयजी टिळक, ह. भ. प. शंकर महाराज मोरे, सामाजिक कार्यकर्ते ह. भ. प. श्रीपादजी कोंडे महाराज, ह. भ. प. रंजनाताई महाराज सोनवणे, प्रकाश महाराज सोनवणे, ह. भ. प. आशाताई चव्हाण, ह. भ. प. श्यामराव महाराज गायकवाड, ह. भ. प. संतोष महाराज दळवी, ह. भ. प. अक्षय महाराज गरड, ह. भ. प. सचिन म्हसे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी उपस्थित साधकांना मार्गदर्शन केले.


कीर्तन व प्रवचनातून संतविचारांचा जागर--

प्रतिष्ठानचे खजिनदार ह. भ. प. प्रविण महाराज मुळे यांनी कीर्तनसेवा सादर केली. तसेच प्रतिष्ठानचे साधक ह. भ. प. चंद्रकांत माऊली, ह. भ. प. एकनाथ मोरे माऊली, ह. भ. प. छाया चव्हाण आणि ह. भ. प. चारुशीला गुल्हाने यांनी संतविचारांवर प्रवचने केली.

या माध्यमातून नामस्मरण, संतपरंपरा, वारकरी विचारसरणी आणि आध्यात्मिक जीवनातील साधनेचे महत्त्व उपस्थितांसमोर मांडण्यात आले.


गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता--

वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवर्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ह. भ. प. श्रीराम महाराज भोमे, ह. भ. प. सोलकर महाराज, ह. भ. प. रंगनाथ नाईकडे महाराज, ह. भ. प. अर्चित महाराज आणि ह. भ. प. गायत्रीताई महाराज यांच्या मार्गदर्शन व आशीर्वादामुळे प्रतिष्ठानचे कार्य सातत्याने पुढे जात असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.


साधक, पदाधिकारी आणि सेवेकऱ्यांच्या योगदानाचे कौतुक

वर्धापन दिन सोहळ्याच्या आयोजनात प्रतिष्ठानचे पदाधिकारी, साधक परिवार, विविध शाखांचे पदाधिकारी, हितचिंतक, देणगीदार तसेच पडद्यामागे राहून सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांचे योगदान राहिले. कार्यक्रमाचे नियोजन, स्वागत, भोजन व प्रसाद व्यवस्था, आसनव्यवस्था, ध्वनीव्यवस्था, स्वच्छता यांसह विविध जबाबदाऱ्या सेवाभावाने पार पाडण्यात आल्या.


“हा सोहळा एका व्यक्तीच्या प्रयत्नांचे फलित नसून गुरुकृपा, पदाधिकाऱ्यांची सेवा, साधकांची साधना, हितचिंतकांचे प्रेम आणि देणगीदारांचे सहकार्य यांचे सुंदर फलित आहे,” असे प्रतिष्ठानच्या अध्यक्षांनी यावेळी सांगितले.


वारकरी शिक्षण आणि नामसेवेचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प--

गेल्या तीन वर्षांत पारमार्थिक सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कीर्तन-प्रवचन प्रशिक्षण, ऑनलाइन वारकरी शिक्षण-प्रशिक्षण, नामसेवा तसेच संतविचारांवर आधारित विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. भविष्यात हे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.


पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. तृतीय वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने संतपरंपरा, नामभक्ती आणि वारकरी विचारांचा जागर अधिक व्यापक करण्याचा संदेश देण्यात आला.

संबंधित बातम्या

पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या मार्गात यंदा बदल.

पुण्यात बापटांना धक्का.

नांदेड सिटीत रंगला स्व. निवृत्ती हगवणे पाटील स्मृती - रामराज्य जेष्ठ नागरिक कर्मयोगी सन्मान सोहळा

गरजू रुग्णांसाठी ‘वैद्यकीय मदत कक्षा’ची स्थापना