📅 29 September 2026, Tuesday
👤 एडिटर लॉगिन ✉️ संपर्क
पुणे

नांदेड सिटीत रंगला स्व. निवृत्ती हगवणे पाटील स्मृती - रामराज्य जेष्ठ नागरिक कर्मयोगी सन्मान सोहळा

स्व. निवृत्ती हगवणे पाटील स्मृती - रामराज्य जेष्ठ नागरिक कर्मयोगी सन्मान पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना प्रदान करताना पद्मश्री गिरीश प्रभुणे व मान्यवर
स्व. निवृत्ती हगवणे पाटील स्मृती - रामराज्य जेष्ठ नागरिक कर्मयोगी सन्मान पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना प्रदान करताना पद्मश्री गिरीश प्रभुणे व मान्यवर


सन्मानांतर्गत शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, ग्रंथ आणि रोख पुरस्कार देण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री गिरीश प्रभुणे, तर विशेष अतिथी म्हणून नांदेड सिटीचे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महानिरीक्षक आयपीएस सुरेश खोपडे उपस्थित होते. पुरस्काराचे देणगीदार निलेश हगवणे, नंदाताई हगवणे तसेच रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ललितांबिका नृत्यशाळेच्या कलावंतांनी सादर केलेल्या गणेशवंदना व रामायण गीताने झाली. त्यानंतर अतिथींच्या हस्ते गणेशपूजन, स्व. निवृत्ती हगवणे पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. चि. आरुष कुलकर्णी यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमात रंगत आणली.

संघाचे अध्यक्ष प्रा. शिरीष पाटील यांनी प्रास्ताविकात स्व. निवृत्ती हगवणे पाटील यांच्या कार्याचा परिचय करून देतानाच पद्मश्री कोल्हे दाम्पत्याच्या सामाजिक व वैद्यकीय कार्याची माहिती दिली. स्व. हगवणे पाटील हे स्वतः कर्मयोगी होते, असे त्यांनी नमूद केले.

यानंतर पद्मश्री गिरीश प्रभुणे, सतीश मगर आणि सुरेश खोपडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कोल्हे दाम्पत्याच्या सत्कारावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.

कोल्हे दाम्पत्याच्या संघर्षमय जीवनाचा उलगडा

प्रख्यात लेखिका, संपादक व मुलाखतकार मृणालिनी चितळे यांनी डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांची प्रकट मुलाखत घेतली. डॉ. स्मिता कोल्हे यांनी खुमासदार शैलीत आपल्या जीवनप्रवासातील अनेक अनुभव सांगितले. विवाहपूर्व सुखासीन जीवनातून मेळघाटातील वीज, पाणी, गॅस, फोन तसेच मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या परिस्थितीत सुरू झालेला संघर्ष आणि त्यातून मिळालेली जीवनाची नवी दिशा त्यांनी उलगडून सांगितली.

डॉ. रवींद्र कोल्हे यांनी डॉ. स्मिता कोल्हे यांच्या प्रथम बाळंतपणाचा हृदयस्पर्शी प्रसंग सांगितल्यावर सभागृह काही क्षण स्तब्ध झाले. कोल्हे दाम्पत्याच्या जीवनातील अशा अनेक प्रसंगांनी मुलाखतीला भावनिक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.

यानंतर सुरेश खोपडे, सतीश मगर आणि पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची भाषणे झाली. पवार पब्लिक स्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर मोघे यांनी केले. त्यांच्या सूत्रसंचालनाचे उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रमाला नांदेड सिटीतील नागरिकांसह विविध वयोगटांतील मोठी उपस्थिती होती. अतिथींचे स्वागत नांदेड सिटी ढोल पथकाने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवाजी खेसे, निलेश हगवणे, प्रमोद कुलकर्णी, मारुती सावंत, सतीश खानझोडे, विलास सास्तुरकर, शोभा साळुंखे तसेच रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या विश्वस्त मंडळातील सदस्यांनी सहकार्य केले. सांस्कृतिक समिती, नांदेड सिटी गणेशोत्सव यांचेही सहकार्य लाभले.

तीन पद्मश्री मान्यवरांची उपस्थिती

एकाच व्यासपीठावर तीन पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवर, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविले गेलेले मान्यवर आणि राष्ट्रपतींशी प्रत्यक्ष भेटलेले मान्यवर उपस्थित असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. रामराज्य ज्येष्ठ नागरिक संघाच्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी कौतुक करून भविष्यातही अशा प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.


संबंधित बातम्या

पुणे महानगरपालिका व महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुनवडी ते पुणे’ उपक्रम

पुण्यातील मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या मार्गात यंदा बदल.

पुण्यात बापटांना धक्का.

गरजू रुग्णांसाठी ‘वैद्यकीय मदत कक्षा’ची स्थापना