पुणे, प्रतिनिधी : आर्थिक अडचणींमुळे गंभीर आजारांवरील उपचार घेण्यात अडथळे येणाऱ्या गरजू रुग्णांना आर्थिक व वैद्यकीय सहाय्य मिळावे, या उद्देशाने श्री साई सेवा मंदिर ट्रस्टच्या वतीने ‘वैद्यकीय मदत कक्षा’ची स्थापना करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या मदत कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
“आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे कोणत्याही गरजू रुग्णाला उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, ही या उपक्रमामागील मुख्य संकल्पना आहे. समाजातील दानशूर नागरिक, वैद्यकीय तज्ज्ञ, सामाजिक संस्था आणि CSR माध्यमातून सहकार्य घेऊन अधिकाधिक रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न राहील,” अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड यांनी दिली.
उद्घाटन सोहळा आयुर्वेदिक क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. कुरुष कुर्मी, पुणे महापालिकेचे परिमंडळ ३ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित शहा, सिंहगड रोड पत्रकार संघाचे अध्यक्ष मिलिंद पानसरे, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार, मंगलदास माने, आरोग्य निरीक्षक संदीप खेराडे, सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ पांचाळ यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून गंभीर स्वरूपाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना आर्थिक व वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. औषधे, वैद्यकीय तपासण्या, उपचार व शस्त्रक्रियांसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहाय्य देण्याबरोबरच रुग्णांना योग्य वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. समाजातील दानशूर नागरिक, विविध सामाजिक संस्था आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) माध्यमातून मदत संकलित करून ती गरजू रुग्णांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शासनाच्या विविध वैद्यकीय योजनांचा लाभ गरजू नागरिकांना मिळवून देण्यासाठीही या कक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. आयुष्मान भारत कार्ड, पुणे महानगरपालिकेचे शहरी गरीब कार्ड तसेच इतर उपलब्ध आरोग्य योजनांबाबत माहिती, मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य देण्यात येणार आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ पांचाळ यांनी श्री साई सेवा मंदिर ट्रस्टच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या उपक्रमासाठी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मदतीचा धनादेश त्यांनी ट्रस्टच्या विश्वस्तांकडे सुपूर्द केला. त्यांच्या या योगदानाबद्दल ट्रस्टच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. गरजू रुग्णांच्या उपचारांसाठी समाजातील दानशूर नागरिकांनी पुढे येऊन सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजी येवले, मुकुंद जोशी, माजी मुख्याध्यापिका संजीवनी मुंदडा, गोपाळ चिटणीस, मोकादाम अशोक साठे, संग्राम पवार, आप्पासाहेब सातपुते, अन्वर खान, अनंता भोईर, केदार जाधव, बाळासाहेब पोरे, आप्पासाहेब कोळेकर, सुरेश कोळेकर, प्रकाश चरवड, सुहास पवार, सुनील चरवड, विश्वजीत चरवड तसेच अन्य मान्यवर व नागरिक उपस्थित होते.


